HEADER

ठरलं ! २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसारच जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणार बदल्या

ठरलं ! २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसारच जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणार बदल्या

यादी जाहीर, अडीच हजार शिक्षक पात्र 

धाराशिव : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी २०२३-२४ की २०२४-२५ ची संचमान्यता गृहीत धरायची? 

हा पेच अखेर सुटला आहे. शासनाने २०२५ च्या संचमान्यतेनुसार बदल्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश दिल्याने शिक्षण विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार २ हजार ५०० वर शिक्षक पात्र आहेत. मात्र, जागा किती रिक्त होतात, यावरच सर्व काही अवलंबून आहे.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी राज्यातील काही जिल्हा परिषदांकडून २०२३-२४ ची संचमान्यता गृहित धरली होती, तर काही जिल्ह्यांनी २०२४-२५ ची संचमान्यता विचारात घेऊन प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे आपण नेमकी कोणत्या वर्षाची संचमान्यता विचारात घ्यावी, यावरून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळे मतप्प्रवाह सीईओंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समोर आले होते. त्यामुळे पेच अधिक घट्ट बनला होता. यातून मार्ग काढत सीईओ डॉ. घोष यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याबाबत शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांना आदेशित केले होते. त्यानुसार मार्गदर्शनही मागविले. यानंतर दुसऱ्याच दिवशी शासनातील वरिष्ठांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसारच बदली प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे बदली प्रक्रियेचा मार्ग आता माळा झाला आहे.

नवीन भरती होणार कशी?

शासनाकडून शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, २०२५ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यात जागा निर्माण होण्याऐवजी आहे ते शिक्षक अतिरिक्त ठरताहेत. अशा शिक्षकांची संख्याही तीनशेच्या घरात आहे. हे असे चित्र राहिल्यास शिक्षकांची भरती होणार कशी, असा सवाल या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

कोणत्या वर्षाची संचमान्यता बदली प्रक्रियेसाठी गृहीत धरावी, यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत २०२४-२५ ची संचमान्यता गृहीत धरावी असे निर्देश मिळाले आहेत. पोर्टल सुरू होताच पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येईल.

-अशोक पाटील, शिक्षणाधिकारी.

तीनशेवर गुरुजी अतिरिक्त ?

२०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मिटून किमान ५० पेक्षा अधिक जागा उपलब्ध झाल्या असत्या. मात्र, २०२४-२५ या वर्षाच्या संचमान्यतेनुसार बदली प्रक्रिया राबवावी, असे शासनाकडून निर्देश आले आहेत. बदललेल्या निकषानुसार जागा रिक्त होण्याऐवजी साधारणपणे तीनशेच्या आसपास शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियम व Custody माहिती