Header Ads Widget

पेढे

                    पेढे 
आकाशात ढगांची दाटी ..... जोरदार पाऊस पडत होता . एम.ए परीक्षा  पेपर सुटला .  मी व माझे मित्र एकत्र भेटलो . मंद वारा ,हवेतील गारवा सोबतच पावसाच्या सरी वाफाळता चहा प्यायला जा असे खुनवीत होत्या . "चला , गरमागरम चहा पिऊ" मी म्हणालो . सगळयांनी एकमताने प्रस्ताव मंजूर केला .
           कॉलेज जवळ असलेल्या एका चहाच्या दुकानात गेलो . चहावाल्या काकाला गरमागरम, वाफाळता चहाची मागणी केली . चहाला आलेला गडद लाल रंग व चहाचा सुगंध जीवनाचं एक गुपित उलगडत होता . " उत्कृष्ठ, चांगले बनण्यासाठी खूप चटके सहन करावे लागतात , सहनशीलता अंगी बनवावी लागते . " 
                      चहा घेतला . सरक नावाचे एक उपक्रमशील शिक्षक माझ्यासोबत होते . ते माझे चांगले मित्र ! शाळेत मुंबई वरून  शाळा भेटीसाठी पाहुणे येणार असल्याचे कळले . ते गिरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत थांबले होते . पाऊस पडत होता. त्यामुळे मी व सरक गुरुजी माझी वॅगणर घेऊन गिरगावच्या दिशेने निघालो . तलासरी ते गिरगाव 18 किमी अंतर . 
          15 - 20 मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही गिरगाव आरजपाढा चार रस्त्याला पोहोचलो . माध्यमिक विद्यालय विद्यार्थी रस्त्यावरून घराच्या दिशेने निघाले होते . तेवढ्यात एक ओळखीचा , अनपेक्षित आवाज कानी पडला . " सर ..सर .." मी विचारात पडलो . " गाडीच्या काचा बंद असताना मला कोणी आवाज दिला ? " म्हणून मी काच खाली घेतली . पाहतो तर काय ! माझी गिरगाव आरजपड्याची रोशनी नावाची विद्यार्थिनी उभी होती .तिने एका शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला होता . थोडीशी लाजरी .. अभ्यासू, खेळाडू , समजदार अशी !  सोबत तिची लहान बहीण होती. " ए , पेढे आन गं ! सर हाईत ! सर "  तिने मला व सरक सरांना पेढे दिले . " पेढे कशासाठी ? " मी कुतूहलाने विचारले. 
" सर , मी दहावी पास झाले !!" हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला .हे सर्व काही अनपेक्षित होतं. मी जिला शिकविले , ती आज दहावी पास होऊन मला पेढे देत होती . पडत्या पावसात ! तिचे मी खूप आनंदाने अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या . आपण करीत असलेल्या कार्याची ही पोहच पावतीच ना !  
पेढे केवळ खाण्याचा पदार्थच नाही , तर ते एक यशाचं प्रतीक आहे . मुलांच्या स्वप्नाला भरारी घेण्याचं बळ देणारं गुपित ! भावनिक जवळीकता व आई बाबा चेहऱ्यावर हसू फुलविणार एक औषध म्हणजे पेढे ! आई वडिलांसाठी पेढे काय असतात , याची प्रचिती काल मला झाली . स्वतः मिळविलेल्या यशाचा महोत्सव असतात पेढे ! आणि आई वडील व शिक्षक यांच्यासाठी जग जिंकल्याची भावना असतात पेढे ! यशाचे साक्षीदार , आनंदाचे वाटेकरी असतात पेढे ! असे पेढे आयुष्यात एकदा तरी वाटायचं व खायचं भाग्य मिळालं . हीच ती शिदोरी ... सोबत कायमची ..... उत्स्फूर्तपणे कार्य करायला लावणारी......पेढे .
@ लक्ष्मण ननवरे 
प्राथमिक शिक्षक 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1