Header Ads Widget

संत : गाडगेबाबा

           संत : गाडगेबाबा 



=======अनिल भुसारी======
           कर्मयोगी संत गाडगेबाबा म्हटलं की हातात खराटा व झाडू घेतलेले स्वच्छतेचे दूत अशी त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. स्वच्छतेचे कार्य आणि विद्रोही असणे याचा कुठे संबंध येतो? असा कदाचित वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. गाडगेबाबांनी जसे स्वच्छतेच्या संदर्भात म्हणजेच रस्त्यावरील घाण काढून ग्राम स्वच्छ करण्याचे जसे काम केले तसेच हजारो वर्षांपासून मेंदूतील बुरसटलेल्या विचारांची घाण काढून मेंदू स्वच्छ करण्याचे काम सुद्धा केलेले आहे. तत्कालीन साहित्यकार प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, तसेच गाडगेबाबांनी काढलेले 'जनताजनार्धन मासिक' वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतो. एकही दिवस शाळेत न गेलेले गाडगेबाबा एका मासिकाचे संस्थापक संपादक होऊ शकतात, हॆ आपल्या बहुजनातील उच्चशिक्षितांनी समजून घेणे आवश्यक आहे. ही कृती सुद्धा एक विद्रोहच दर्शविते. भारतीय लोकांचा संताकडे बघण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक अंगाने अधिक आहे त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा, बळीप्रथा, जातीभेद याविरुद्ध जो आवाज उठवीला किंवा ईश्वराविषयी त्यांनी जी संकल्पना मांडली त्याकडे साफ दुर्लक्ष केल्या जातो. खरं तर संत रोहिदास, कबीर, चक्रधर, महात्मा बसवेश्वर,, नामदेव, तुकाराम हॆ सामाजिक परिवर्तनाच्या कार्यातील विद्रोही संत आहेत आणि त्याच मांदीयाळीतील नाव म्हणजे संत गाडगेबाबा.
 *स्वतःपासून_सुरुवात_परंपरेला_छेद_दिला :*  गाडगेबाबा ज्या जातीतून येतात त्या जातीत कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी नवस म्हणून दारू व मटणाचे जेवण देण्याची प्रथा होती. त्या प्रथेला छेद देत गाडगेबाबांनी मुलीच्या बारशाला दारू व मटणाएवजी गोड जेवणाची पंगत घातली तेव्हा लोकांनी त्यांना विरोध केला, जातीच्या बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या. परंतु कशालाही न जुमानता त्यांनी परंपरा, दैव - दैववाद, अंधश्रद्धा झुगारून मुलीचा बारसा केला. त्या काळात समाजविरोधात जावून परिवर्तनीय कृती करणे ही साधी बाब नव्हती. ती कृती त्यांनी केली म्हणूनच ते विद्रोही ठरतात. गाडगेबाबांनी *'बोले तैसा चाले'* म्हणण्यापेक्षा *'चाले तैसा बोले'* अशी सुरवात केली.
*व्यसनांवर_प्रहार :* गाडगेबाबांच्या वडिलांची सुरुवातीला आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती. परंतु रूढी, परंपरा, कर्मकांड यात गुरफटून ते दारुच्या आहारी गेले आणि कुटुंबाला कर्जबाजारी करून मृत्यूला कवटाळले. वडिलांचा व्यसनाधीनतेमुळे मृत्यू झाला हॆ गाडगेबाबा जाणून होते, म्हणून त्यांनी कायम तरुणांना  व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तरुणांना शिक्षणाकडे वळण्याचा मार्ग सांगितला *महात्मा फुलेंच्या शब्दात सांगायचं झाल्यास *"थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी '*  कीर्तनातून व्यसनाधीनतेवर हल्ला करतांना ते म्हणत, *'दारू गांजा मत पी यारो | अक्कल गुंग हॊ जाती है|*
*अपने कमरका दाम खरचके | मुखमे मिठीया पडती है ||*
   एकीकडे गाडगेबाबांचे नाव घ्यायचे, प्रबोधनकाराचा वारसा सांगायचा आणि किराणा दुकानातून दारू विकण्याची परवानगी देण्याचे निर्णय घ्यायचे म्हणजे सरकारची मती गुंग झाली आहे असं म्हणण्याला वाव आहे. महामानवाचे नाव घ्यायचे  आणि त्यांच्या जयंतीला डीजेच्या तालावर दारू पिऊन गुंग होऊन नाचणाऱ्या आजच्या तरुणांनी जयंत्या - मयंत्यांना नाचण्यापेक्षा महामानवाचे चरित्र वाचून चारित्र्य घढविणे आवश्यक आहे.
*अंधश्रदेवर_प्रहार :*   गाडगेबाबांच्या अंधश्रदेच्या कार्याबाबतीत बोलायचं झाल्यास *"स्वच्छ करी बाबा | डोक्यातील घाण | झाडून पुसून | अंधश्रद्धा ||* गाडगेबाबा म्हणजे आधी सांगितले मग केले. या उक्तीप्रमाणे वागणारे सुधारक होते. याचे उदहारण म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे प्राणी बळी न देता मुलीचा केलेला बारसा. तसेच गाडगेबाबांनी अमरावती येथे नारायणगुरूच्या यज्ञा मध्ये होणारी पशुहत्या आंदोलन करून थांबविली. बहिरमच्या जत्रेत मोठया प्रमाणात बकऱ्यांची बळी थांबविली.
अंगात देव आल्याचे सोंग करणाऱ्यांना नि अंगारे देणाऱ्यांना तुकाराम महाराजांच्या शब्दात फैलावर घेतांना म्हणतात, *"अंगी दैवत संचारे | मग तिथे काय उणे || "* म्हणजे गाडगेबाबा अगदी मर्मावर बोट ठेवत. संतांच्या नावाचा फक्त उदो - उदो करून किंवा त्यांच्या आरत्या - भजन करून चालणार नाही तर त्यांनी सांगितलेल्या विचारांवर पाऊल ठेवून नविन मानव धर्माच्या शोधाकरिता झगडलं पाहिजे.
अलीकडे लग्न झालं घाल सत्यनारायण, मुलगा झाला घाल सत्यनारायण, घर बांधलं घाल सत्यनारायण, नौकरी लागली घाल सत्यनारायण एवढं सत्यनारायणाचं स्वरूप बोकाळलं आहे. सत्यनारायण घालणाऱ्यांनी एकदा गाडगेबाबांनी मुंबई पोलिसांसमोर दिलेले शेवटचे कीर्तन नक्कीच वाचावे आणि मगच सत्यनारायणाच्या मागे लागावे. या संदर्भात गाडगेबाबा (मी नाही ) म्हणतात, "सत्यनारायणाची प्रसाद खाल्याने कलावती व लिलावतीच्या साधुवाण्याची समुद्रात बुडालेली बोट जर वर येत असेल तर दोन महायुद्धात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेच्या शेकडो  मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत तर त्या बाहेर काढण्यासाठी त्यांना सत्यनारायणाची सोपी पद्धत कोणी का सांगितली नाही? "
        जे लोकं मुलं होण्याकरिता नवस करतात, अशा लोकांना नवस कसं वायफळ आहे हॆ सांगताना ते म्हणतात, *"नवसे कन्या - पुत्र होती | मग का करणे लागे पती ||"* परंतु आजही मुलं होण्यासाठी उच्चशिक्षित व त्यातही वैद्यकीय क्षेत्रातील लोकं नवस करतांना बघतो तेव्हा खरचं आम्ही विज्ञानाचा विषय जीवन जगण्याकरिता शिकलो की गुणपत्रिकेवरील फक्त अंक वाढवीण्याकारिताच शिकलो ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
आधुनिक वैचारिक विचारांची पेरणी करणाऱ्या संतांच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र बाहेरील एक भागेश्वर नावाचा ढोंगीबुवाने अंधश्रद्धा, कर्मकांड, नवस याचा उदातीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याला संतांच्या विचाराने तयार झालेल्या महाराष्ट्रातून मात्र त्याला पळ काढावं लागलं. आज कर्मयोगी संत गाडगेबाबा असते तर त्यांनी  त्यांच्या खराट्याने बदडलं असतं आणि भाग्यश्वरचं समर्थन करणाऱ्यांना त्याच खराट्याने धुतलं असतं.
*तीर्थात आणि दगडात देव शोधणाऱ्यांविषयी :-* तीर्थयात्रेला गेल्याने पुण्य मिळून मागील जन्मातील पापें धुतल्या जातात ही समज कशी खोटी आहे या संदर्भात गाडगेबाबा कीर्तनातून तुकोबारायांच्या अभंगाचा दाखला देत सांगतात, *"तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी | तिर्तिक्षेत्रे गेले, दाढी -मिशी बोडून आले | पाप तैसेचि राहिले, दाढी - मिशीने काय केले |*   संत तुकडोजी महाराज सुद्धा यासंदर्भाने म्हणतात, "तूझ्या गावाचं नाही का तीर्थ, तु कशाला रिकामं फिरतं |" एवढं साध्या सरळ भाषेत आम्हाला महामानवांनी सत्य - असत्य ओळखण्यास सांगितलेले आहे.परंतु आम्ही मोबाईल ओल्ड मॉडेल झाला म्हणून वर्षाला मोबाईल बदलवणारे आपल्या मेंदूतील जुन्या बुरसटलेल्या मानसिकतेला बदलण्यास किंवा अपडेट करण्यास तयार नाही.
शाळेची पायरी न चढणारे गाडगेबाबा पुढे देवाच्या नावावर बाजार मांडणाऱ्यांना फटकारतांना म्हणतात, *"शेंदूर माखुनिया धोंडा, पाया पडती पोरे - रांडा | देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला | देव सोन्याचा घडविला, सोनार त्याचा बाप झाला | सोडूनिया खऱ्या देवा," करी म्हसोबाची सेवा ||"* विज्ञानाच्या वर्गात न बसलेले संत आम्हाला अगदी सोप्या भाषेत विज्ञान शिकवतात. तर विज्ञान शिकून प्रध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, राजकीय नेते अंधश्रदेच्या आहारी जातांना दिसतात. आपल्यापेक्षा कमी ज्ञान आणि वयाने लहान असणाऱ्या पुरोहिताचे पाया पडतांना यांना पहिले की मन विशन्न होते. मनात प्रश्न पडतो की खरचं आम्ही विज्ञान युगात आहोत की पौराणिक काळात जगत आहोत. पाश्चिमात्य देशाप्रमाणे आम्हाला आमच्या देशातही नव -नवीन शोध लागावेत, आमच्या मुलांनीही अंतराळात फिरायला जावे.  असं वाटत असेल तर तर फक्त गुणपत्रिकेवरील गुणांचा विचार न करता  वास्तविक जीवन गुणवान कसं होईल या दृष्टीने त्यांना गुणवान होण्यासाठी प्रयत्न करू या.
         मित्रांनो कर्ज काढून सणवार साजरे करू नका, भुकेलेल्यांना अन्न द्या, दारू पिऊ नका, दगडाच्या देवाच्या आणि नवसाच्या नादी लागू नका, तो तुमचं काही भलं करणार नाही. *"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा |"* असं सांगून खरा देव कोणता? असे सांगणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबांना विद्रोही संत म्हणणेच योग्य होईल.
     अशा विद्रोही कर्मयोगी गाडगेबाबांना 147 व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

#गाडगेबाबाजयंती2023
#Gadgebabajayanti2022
=========== व्याख्याते==========
              अनिल भुसारी, तुमसर...

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1